झिजेचा संधिवात :
झिजेचा ऑस्टिओ – अर्थ्रायटिस संधिवात हा चाळिशीनंतर होणारा आजार वाढत्या वयाने सांध्यांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होतो . जस-जसे वय वाढेल तसतसे संधिवात होण्याची शक्यता जास्त. सांध्यातील कुर्चा झिजल्याने ऑस्टिओ अर्थ्रायटिस नावाचा संधिवात होतो. ज्या सांध्यांना आयुष्यभर जास्त काम पडते, तेथे असा संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गुडघा, मानेचे आणि कंबरेचे मणके तसेच बोटांच्या पुढच्या पेरांच्या सांध्यांना हा संधिवात विशेष करून होतो.
लक्षणे
सांधा दुखणे, कधी जखडल्यासारखे वाटणे, थोडीशी सूज, हालचाल करताना करकर आवाज येणे, अशी याची लक्षणे. काम केल्यानंतर किंवा व्यायामानंतर हे दुखणे वाढते आणि विश्रांतीने कमी होते. गुडघा जास्त बिघडत गेला की तो सैल होतो, आणि चालता चालता अचानक वाकतो. त्यामुळे धडपडण्याची शक्यता असते. सांध्यांच्या हाडांच्या छोट्या छोट्या गाठी () होतात. त्यामुळे कधी सांधा अडकतो. आणि अजिबात हलू शकत नाही. एका जागी फार वेळ बसले तर उठल्यावर पावले मुश्कील होते. असे सांधे रात्रीही दुखतात. आणि सकाळी जखडल्यासारखे होतात. दुखणारा सांधा साहजिकच कमी वापरला जातो. त्यामुळे आजूबाजूचे स्नायू अशक्त होतात, आणि सांधा आणखी बिघडत जातो. सांध्याच्या आत वंगणासारखा द्रव असतो. स्निग्धता, चिकटपणा हे त्याचे गुणधर्म. दुखल्याने हालचाली नीट होत नाहीत, त्यामुळे कधी सांध्याच्या आत इजा होऊन सूज येते. सुजेमुळे सांध्यातल्या त्या द्रव्याचे प्रमाण वाढते.द्रवाचा चिकटपणा कमी होतो. स्नायू आखडतात आणि आणखी दुखते.
निदान
स्त्री – पुरुषांचा गुडघा दुखत असेल आणि तपासताना गुडघ्यात खरखर जाणवली कि, या संधिवाताचे निदान पक्के होते. एक्स-रे तपासणीत संधिवाताचे गांभीर्य समजते .
उपचार
झिजलेली कुर्चा पुन्हा निर्माण करण्याची आपल्या शरीरात सोय नाही. वेदना कमी करणे अणि सांध्याची कार्यक्षमता सुधारणे हे ऑस्टिओ-आर्थ्रायटिस संधिवाताच्या उपचाराचे मुख्य उद्दिष्ट . अतिताणाने सांधे दुखतात . सामान्यतः दुखणे हि मर्यादा समजून त्या मर्यादेतच सांध्याचा वापर केला पाहिजे . मसाज , एक्यूपंक्चर इत्यादी उपायांनी तात्पुरता अराम मिळतो . सांध्यात स्टिरॉइड चे इंजेकशन दिले तर दुखणे तीन-चार महिन्यांसाठी थांबते . त्यात कोणताही धोका नाही . मात्र वर्षातून तीन – चार पेक्षा जास्त वेळा इंजेकशन देता येत नाही . वेदना थांबली की पुढच्या तीन-चार महिन्यांत नीट व्यायाम करता येतात .मांड्याची ताकद वाढते आणि दुखणे कमी होते. सांध्यातल्या द्रवाचा चिकटपणा कमी झाला म्हणून त्यात नवीन वंगण घातले कि, सांधा सुधारेल अशी त्यात संकल्पना! त्यासाठी महागडी विस्को वंगणपूरके निघाली. काही पेशंटमध्ये त्याचा उपयोग दिसतो . कॅल्शियम तसेच ब आणि ड जीवनसत्त्व पुरेसे असावे. ऑस्टिओ ऑर्थ्रायटिस अचानक एका दिवसात येत नाही. ती वर्षानुवर्षे चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे थोडी लक्षणे दिसताच व्यायाम सुरु केला पाहिजे. चालण्याच्या व्यायामाने सांध्यात ताकद वाढते , वजन कमी होते. आणि गुडघ्याचा तसेच कमरेचा संधिवात बळावत नाही.
खूप दुखत आणि खांदा दुखून निकामी झाला असला तर ऑपरेशन करून गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया अवश्य करावी . त्यासाठी वजन मात्र नियंत्रणात हवे . ९०% रुग्णांमध्ये ऑपरेशनचा पुरेसा फायदा दिसून येत नाही.